राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात निवडणूक लढवा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना खुलं आव्हान
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
ठाणे : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाचं आव्हान दिला आहे. रविवारी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात सभांचा धडाका लावला आणि ठाण्यात ‘इलाका हमारा और धमाका भी हमारा होगा’ असं म्हणत एकनाथ शिंदेंना ठाण्यात आपल्या विरोधात उभे राहण्याचं आव्हान दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांचा पालिकेचा समजला जाणारा ठाणे जिल्हा आणि याच ठाणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष केंद्रित करत आहे. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला नाही, तर ‘हा इलाका भी हमारा आणि धमाका भी हमारा’, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी रविवारी ठाण्यामध्ये सभांचा धडाका लावला. आनंद नगर, मनोरमा नगर, चंदनवाडी, जिजामाता नगर या चार शाखांच्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी सभा घेतल्या.
आदित्य ठाकरेंनी संपूर्ण ठाणे शहरात एक प्रकारे पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन केलं. या सभांमध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच आदित्य ठाकरे यांनी आपल्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा आव्हान दिलं. भाषणात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान देतं म्हटलं की, ‘एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, हा कोणाचा बालेकिल्ला नाही.’
आदित्य ठाकरे हे आव्हान देऊनच थांबले नाहीत तर एकनाथ शिंदे ही घटनाबाह्य अपयशी मुख्यमंत्री आणि शिवसैनिक म्हणून अपयशी ठरल्याचा उल्लेख त्यांनी केला. 20 मे 2022 ला एकनाथ शिंदे हे वर्षावर येऊन उद्धव ठाकरे समोर रडले आणि भाजप मला जेलमध्ये टाकेल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर एका महिन्यातच त्यांनी गद्दारी केली असं आदित्य ठाकरेंनी भाषणात सांगितलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्यात शड्डू ठोकल्यानंतर आणि आव्हान दिल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या या प्रतिक्रिया विरोधात भाष्य करायला सुरुवात केली आहे.
आदित्य ठाकरेंचं शिंदेंच्या ठाण्यात शक्तीप्रदर्शन या आधी सुद्धा अशाच प्रकारची आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना दिले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष ठेवून आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या ठाण्यात पक्षाचे बळ वाढावं यासाठी मेळावे सभा दौरे ठाकरे गटाकडून आयोजित केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या शाखा भेटींचा कार्यक्रम कल्याण लोकसभा मतदारसंघातून काही दिवसांपूर्वी सुरू केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कल्याणमध्ये जाऊन सभा घेतली आणि आता ठाण्यामध्ये शाखा भेटी सुरू केल्या. त्यामुळे पक्षाकडून पूर्ण ताकद या ठाणे जिल्ह्यात लावताना पाहायला मिळतंय.



