आरोग्य व शिक्षण

दि. 28 मार्च ते दि. 04 एप्रिल 2024 कालावधीत होणार पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षा

 

बंटी पाटील – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड 

रायगड दि.18 इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी वार्षिक परीक्षा, पुर्नपरीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती दि. 07 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या दि.28 मार्च ते दि.04 एप्रिल 2024 कालावधीमध्ये वार्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती पुनिता गुरव यांनी दिली आहे.

दि. 29 मे 2023 अन्वये महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियमामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार, इयत्ता 5 वी व 8 वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल. जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही, तर त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करुन वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल. जर ते बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झाले, तर त्याला इयत्ता 5 वी च्या वर्गात किंवा इयत्ता 8 वी च्या वर्गात, जसे असेल तसे ठेवले जाईल. मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकास शाळेतून काढून टाकले जाणार नाही. अशी तरतूद करण्यात आली आहे.

परीक्षा द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. वार्षिक परीक्षांसाठी 5 वी ला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास 1 व परिसर अभ्यास 2 हे विषय असतील. 8 वी साठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय असणार आहेत. परीक्षेकरिता प्रत्येक शाळेने शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घ्यावयाची आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करून शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करावयाच्या आहेत.

नियतकालिक संकलित मूल्यांकन चाचणी 2 (PAT) शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षात शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील इ. 3 री ते इ. 8 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (10 माध्यम) करिता तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यापैकी इयत्ता 3 री ते इ. 8 वी साठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांकरिता नियतकालिक मूल्यांकन चाचणी हीच संकलित मूल्यमापन 2 असणार आहे. त्यामुळे या विषयांसाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यमापन-2 घेण्यात येणार नाही. तसेच इयत्ता 3 री ते 8 वी साठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत होणार आहे. या संकलित मूल्यमापन चाचणीचे आयोजन दि.02 एप्रिल ते दि.04 एप्रिल 2024 कालावधीमध्ये राज्यात एकाच वेळी करण्यात येणार आहे. उर्वरित विषयांचे संकलित मूल्यमापन 2 शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका विकसित करुन घ्यावयाची आहे.

सर्व शाळांनी दिनांक 07 डिसेंबर, 2023 च्या शासन निर्णय व सूचनांप्रमाणे आपल्या स्तरावर इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षा अंमलबजावणी करून यशस्वीपणे पार पाडाव्यात व योग्य ती दक्षता घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!