जिल्हा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

 

मिलिंद पवार – शहर जिल्हा प्रतिनिधी रायगड 

दि.1 जून ते दि.24 जुलै 2023 या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान 463.8 मिमी असून या खरीप हंगामात दि.24 जुलै 2023 पर्यंत प्रत्यक्षात 457.8 मिमी (दि.24जुलै पर्यंतच्या सरासरीच्या 99%) एवढा पाऊस पडलेला आहे. खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून दि. 24 जुलै 2023 अखेर प्रत्यक्षात 114.64 लाख हेक्टर ( 81 टक्के ) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीच्या कामास वेग आला आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. आज रोजीपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 44.08 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस पिकाची 39.88 लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची 9.66 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची 6.69 लाख हेक्टर क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे.

खरीप हंगाम 2023 करीता 19.21 लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विं. बियाणे उपलब्ध आहे. राज्यात 19.30 लाख क्विं. (100%) बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामाकरिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेते यांच्याकडून बियाणे खरेदी करावे तसेच पावती व टॅग जपून ठेवणे आवश्यक आहे.

खरीप हंगाम 2023 करिता राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत 50.40 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 23.88 लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात 26.52 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.31 जुलै 2023 असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

कृषी विभागामार्फत खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, कीटकनाशके किंवा बियाणे याबाबत तक्रार असल्यास 8446117500, 8446221750, 8446331750 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच राज्‍याचे कृषी मंत्री मा.ना. धनंजय मुंडे यांनी निर्देशित केल्‍याप्रमाणे बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग / निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून हा कक्ष 24 X 7 कार्यरत राहील. या संदर्भातील तक्रार शेतकऱ्यांना 9822446655 या व्हाट्स अॅप क्रमांकावर केवळ व्हाट्स अॅप संदेशाद्वारे नोंदविता येईल. याशिवाय शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या मेल आयडीवर सुद्धा मेल द्वारे करू शकतात. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नांवे गोपनीय ठेवण्यात येतील. कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी 18002334000 हा कृषी विभागाचा हेल्पलाईन नंबर असून शेतकरी बंधूंनी आवश्‍यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहन आयुक्‍त कृषी, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे सुनील चव्‍हाण यांनी राज्‍यातील शेतकरी बांधवांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!