महाड शहरात उघड्या गटारांमुळे दुर्गंधी अन् मच्छरांचा प्रादुर्भाव; नागरिक त्रस्त, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रदीप सोंडकर महाड शहर प्रतिनिधी
महाड नगरपरिषदेच्या हद्दीतील अनेक भागांत गटारांवर झाकणे नसल्याने उघड्या गटारांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. साचलेले गलिच्छ पाणी, कचरा आणि उघडी गटारे यांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पालिका प्रशासनाच्या या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील विविध रस्त्यांच्या कडेला असलेली गटारे अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत आहेत. गटारांमध्ये सांडपाणी तुंबल्यामुळे आणि योग्य सफाई न झाल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच, या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
गटारांवर झाकणे नसल्याने रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांना, लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
नगरपालिकेने या गंभीर समस्येची त्वरित दखल घेऊन उघड्या गटारांची स्वच्छता करावी, त्यावर सिमेंटची अथवा योग्य झाकणे बसवावीत आणि औषध फवारणी करावी, अशी जोरदार मागणी महाड शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.



