श्रीवर्धन पोलिसांची दमदार कामगिरी
वाहतूक कोंडीसह बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई; नगर परिषद-पोलिसांचा संयुक्त पुढाकार

श्रीवर्धन प्रतिनिधी – अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरातील वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना सुरू केल्याने शहरातील वाहतुकीला हळूहळू शिस्त लागल्याचे चित्र दिसून येत आहे. जानेवारी २०२६ मध्ये श्रीवर्धन पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र गरड यांनी वाहतूक व्यवस्थापनासह कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे.
श्रीवर्धन शहरात विशेषतः पर्यटन हंगाम, सण-उत्सव आणि गर्दीच्या काळात वाहतूक कोंडीचा प्रश्न नागरिकांसाठी मोठा मनस्तापाचा विषय ठरत होता. मुख्य रस्त्यांवर वाहनांची गर्दी, रस्त्याच्या कडेला होणारे बेशिस्त पार्किंग तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत असे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त व गस्त वाढवून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली आहे.
वाहतूक नियमांचे पालन व्हावे, अपघातांना आळा बसावा आणि वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी पोलिसांकडून हेल्मेट तपासणी, वाहनांची कागदपत्रे तपासणी तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पुढील काळातही ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रस्त्यावर दुचाकी अथवा इतर वाहने बेशिस्तपणे उभी करणाऱ्या वाहनचालकांवरही पोलिसांची नजर आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच, आवश्यकतेनुसार वाहने उचलण्याची व जप्त करण्याची कार्यवाही करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.
नगर परिषद-पोलिसांचा संयुक्त पुढाकार
श्रीवर्धनचा समुद्रकिनारा हा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असल्याने पर्यटन हंगामात या परिसरात वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे समुद्रकिनारी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था तसेच फेरीवाल्यांचे नियोजन करण्यासाठी श्रीवर्धन नगर परिषद आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे पुढाकार घेत आहेत. यामुळे समुद्रकिनारी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना अधिक सुरक्षित व सुलभ वातावरण उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी टोईंग वॅन
शहरातील रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांना आळा घालण्यासाठी आगामी काळात श्रीवर्धन नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त माध्यमातून टोईंग वॅन उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. नो-पार्किंग क्षेत्रात किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून संबंधित वाहने टोईंग वॅनच्या माध्यमातून हटविण्यात येणार आहेत. त्यामुळे बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांना चाप बसून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
गणेशोत्सव, गोपाळकाला उत्सवातही चोख नियोजन
श्रीवर्धन पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक गणेशोत्सव आणि गोपाळकाला उत्सवादरम्यानही होत आहे. सण-उत्सवांच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असतानाही पोलिसांनी बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेचे योग्य नियोजन केले. गणेशोत्सवातील विविध कार्यक्रम तसेच विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गोपाळकाला उत्सवादरम्यानही गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. या नियोजनामुळे दोन्ही उत्सव शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सण-उत्सवांच्या काळात पोलीस प्रशासनाने घेतलेल्या दक्षतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
गैरप्रकारांवरही पोलिसांची करडी नजर
दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे. अवैध दारूविक्री तसेच सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. त्यामुळे शहरातील गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.
पोलीस प्रशासनाकडून वाहतूक नियंत्रण, नियमभंग करणाऱ्यांवरील कारवाई, सण-उत्सवांचे नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्याने श्रीवर्धन शहरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटल्याने नागरिक आणि वाहनचालकांकडून श्रीवर्धन पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
आगामी काळात नगर परिषद, पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून श्रीवर्धनची वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होण्यासोबतच शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



