परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका; कापणी केलेले भातपीक भिजल्याने नुकसान
श्रीवर्धन तालुक्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली; हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला

अनिकेत मोहित / श्रीवर्धन प्रतिनिधी
आधी पावसाच्या अनियमिततेमुळे आणि नंतर रानडुकरांच्या उपद्रवामुळे दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता परतीच्या पावसाचे नवे संकट उभे राहिले आहे. काबाडकष्ट करून पिकवलेले भातपीक कापणी करून शेतात वाळत घातले असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी केलेले भातपीक पावसाच्या पाण्यात भिजल्याने त्याचा दर्जा खालावण्याची तसेच उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यंदा श्रीवर्धन तालुक्यात पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका भातशेतीला बसला. भातलावणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या वाढीबाबत चिंता लागून राहिली होती. त्यातच भातपीक तयार होण्याच्या टप्प्यात रानडुकरांनी शेतात घुसून पिकांचे नुकसान केले. या संकटांवर मात करत शेतकऱ्यांनी भातपीक कापणीला सुरुवात केली होती. मात्र, कापणी केलेले भात शेतात वाळवण्यासाठी ठेवले असतानाच परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
कापणी केलेल्या भाताच्या पेंढ्या आणि सुट्या लोंब्या पावसात भिजल्याने धान्याला ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे भात काळवंडणे, दाण्यांची प्रतवारी खराब होणे आणि साठवणुकीदरम्यान नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच कमी उत्पादनामुळे आर्थिक गणित बिघडलेल्या शेतकऱ्यांना आता या नुकसानीचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.
शेतीसाठी लागणारा वाढता खर्च, मजुरीचे दर, बियाणे आणि खतांचा खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. वर्षभराच्या मेहनतीनंतर हाती येणाऱ्या भातपिकातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि पुढील हंगामाचे नियोजन केले जाते. मात्र, निसर्गाच्या बदलत्या लहरींमुळे शेतकऱ्यांचे हे आर्थिक गणित कोलमडत आहे.
दरम्यान, परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीची कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी, अशीही मागणी होत आहे.
आधी पावसाची प्रतीक्षा, नंतर रानडुकरांचा उपद्रव आणि आता कापणीच्या वेळी परतीच्या पावसाचा मारा, अशा संकटांच्या मालिकेत श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी भरडला जात असून, बळीराजाला दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.



