वडखळ मार्गावरील खड्ड्याना पीएनपी कारणीभूत – राजाभाई केणी
बंटी पाटील – तालुका प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग : धरमतर जेट्टी ते वडखळ दरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालाय, यास पीएनपी जेट्टीवरून होणारी अवजड वाहतुक कारणीभूत आसल्याचा आरोप शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी केला आहे. पीएनपी कंपनी कडून कोळसा, गंधकाने भरलेले मोठ मोठे ट्रक वडखळ दिशेने दररोज जात असतात. त्यामुळे या मार्गावर पडलेल्या खडडयाना जेएसडब्ल्यू प्रमाणेच पीएनपी कंपनीही तितकीच जबावदार असताना पीएनपीने एक खड्डा देखील दुरुस्त करण्याची तसदी दाखवली नसल्याने सामान्य नागरिकांमधून पीएनपी कंपनी विरोधात कमालीचा असंतोष पसरत असल्याचे म्हणणे राजाभाई केणी यांचे आहे.
जेएसडब्ल्यु कंपनीने त्याच वेळेस आपली जबाबदारी ओळखून वेळोवेळी दुरुस्ती केली आहे. आताही जेएसडब्ल्यू कंपनीने सिमेंट काँक्रीटकरणाचे काम हाती घेतलेय. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे अधिकारी यशवंत घोटकर आणि जेएसडब्ल्यू कंपनीच्या अधिकार्यांची सोमवार ( ता. 19) रोजी पेण येथे बैठक झाली. या बैठकीत या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. धरमतर जेट्टी ते वडखळ पर्यंतचा रस्ता जेएसडब्ल्यू कंपनी सामाजिक दायित्व फंडातून करून देण्यास तयार आहे. परंतु या कामात काही व्यक्ती राजकीय खोडा घालीत असल्याचे म्हणणे राजाभाई केणी यांचे आहे. स्वतः काही करायचे नाही, तर दुसर्याने केलेल्या कामात राजकारण आणायचे ही शेकापच्या नेत्याची नेहमीची पद्धत असल्याचे म्हणत राजाभाई केणी यांनी शेकापच्या फसव्या राजकारणाला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन केले आहे. पीएनपी मेरी टाईम सव्हिर्सेस प्रा. लि. कंपनीने धरमतर पीएनपी पोर्टचा कारभार सुरू केल्यापासून या कंपनीनी धरमतर ते वडखळ या मार्गावरील 20 वर्षात एकही खड्डा भरण्यासाठी अर्थिक मदत केलेली नाही. असे असताना कंपनी दरवर्षाला करोडो रुपयांचा नफा मिळवत आहे. या नफ्यातून कंपनीने कांदळवनाची जागा बळकावत आपल्या धंद्याचा विस्तार केला. मात्र या धंद्यामुळे नाहक त्रासाची भर पडली आहे. सामान्य नागरिकांना दररोज कंबरतोड प्रवास करावा लागतो. अलिबाग– वडखळ मार्गावरील धरमतर जेट्टी ते वडखळ मार्ग सर्वाधिक खराब झाला असून पीएनपी बंदरातून निघणारे मोठमोठे ट्रक याच मार्गाने वाहतुक करीत असतात, त्यामुळे शेकापच्या नेत्यांनी नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करू नये, असे राजाभाई केणी यांचे म्हणणे आहे.



