जिल्हा

विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना २०० रुपये प्रति टन ऊस बिलाचा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा

दीवाळीला १५० रुपये प्रति टन बील देणार / शेतकऱ्यांना प्रति टन 2700 रु. दर मिळणार

पुढील हंगामाची तयारी पूर्ण / तीस लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट – आमदार बबन शिंदे

अनिल अवताडे – तालुका प्रतिनिधी माढा

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-2023 हंगामात गळीतास आलेल्या उसाचे २०० रुपये प्रति टन प्रमाणे दुसऱ्या हप्त्याचे बिल शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबन शिंदे यांनी दिलेली आहे, यानंतर दसरा सणाचे दरम्यान दिवाळीनिमित्त आणखीन १५० रुपये प्रति टन बिल व त्याच वेळेस नेहमीप्रमाणे दिवाळी सणासाठी प्रत्येक ऊस पुरवठादार शेतकरी सभासदास योग्य दरात 50 किलो साखर घरपोच देण्यात येणार आहे .यानुसार मागील 2022- 23 हंगामात गळीतास आलेल्या उसाला विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना प्रतिटन 2700 रु. दर देत असून त्यापैकी आता 2550 रुपये शेतकऱ्यांना पोहोच झालेले आहेत. मागील हंगामात मार्च 23 मध्ये उशिरा गाळपास आलेल्या उसाला १५० रुपये प्रति टन जादा दर पहिल्याच ऊस बिलात वाढऊन देण्यात आलेला आहे, त्यामुळे मार्च मधील ऊसाला एकूण 2850 रुपये प्रति टन दर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे मागील हंगामात गळितास आलेल्या उसाचे बिल प्रत्येक दहा दिवसाला शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. एकंदरीत पाहता एकूण 2700 रुपये प्रति टन ऊस बिल मिळत असल्यामुळे शेतकरी, सभासद, ऊस पुरवठादार यांचे मधून समाधान व्यक्त होत आहे. मागील हंगामात गाळप झालेल्या ऊस बिलाचा दुसरा हप्ता देणारा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यातील आणि राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे असेही आमदार बबन शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

अधिक माहिती देताना आमदार बबन शिंदे म्हणाले की मागील हंगामात विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर युनिट एक मध्ये 18 लाख 41 हजार मेट्रिक टन व करकंब युनिट दोन मध्ये 5 लाख 28 हजार मेट्रिक टन असे दोन्ही युनिटमध्ये एकूण 23 लाख 69 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. शेतकऱ्यांना उसाची पक्की बांधणी, नवीन उसाची लागण, मुला-मुलींचे शिक्षण, सणवार यासाठी पैशाची आवश्यकता जाणूनच सध्या 200 रुपये प्रति टन उसबीलाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे.

विशेष माहिती देताना आमदार बबन शिंदे म्हणाले की कारखान्याच्या सन 2023- 2024 च्या पुढील गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. 700 ट्रॅक्टर, 500 बजाट, 750 बैलगाड्या अशा ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या १९५० वाहनांचे करार पूर्ण झाले असून सर्व वाहन मालकांना ऍडव्हान्स पहिला हप्ता देण्यात आलेला आहे. सन 23 -24 च्या हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर कारखान्याकडे ऊस उपलब्ध असून आगामी पावसाळ्यात वेळेवर, भरपूर व समाधानकारक पाऊस झाल्यास प्रति एकरी ऊसाच्या वजनात वाढ होणार आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर युनिट एक मध्ये 23 ते 25 लाख मेट्रिक टन व करकंब युनिट दोन मधे 5 ते 6 लाख मेट्रिक टन ,याप्रमाणे पुढील हंगामात एकूण 28 ते 30 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा कारखान्याच्या संचालक मंडळांचा निश्चय आहे .या कारखान्याचा 38 मेगावॅट विज निर्मिती प्रकल्प यशस्वीपणे चालू असून प्रतिदिन तीन लाख लिटर इथेनॉल उत्पादन होत असलेला 300 के एल पी डी चा डिस्टिलरी प्रकल्प व्यवस्थित कार्यरत असल्याचेही आमदार बबनदादांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव, शेतकी अधिकारी संभाजी जगताप, कॅन मॅनेजर संभाजी थिटे, फायनान्स मॅनेजर दिलीप लवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!