भाविकांच्या श्रद्धेशी खेळ सुरूच; यंदाही गणेश विसर्जन धोक्यात?
ग्रामपंचायतीने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा दुर्घटनेची जबाबदारी कोणाची?

अक्षता जामकर / रोहा शहर
रेवदंडा : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलाय…मात्र रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा चिखलाचे साम्राज्य…. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांना गणेश विसर्जनासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होतोय..
रेवदंडा, चौल व परिसरातील हजारो भाविक परंपरेने रेवदंडा समुद्रकिनारी श्री गणेशाचे विसर्जन करतात… सुरक्षित आणि प्रशस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समुद्रकिनाऱ्याची आजची अवस्था मात्र अत्यंत चिंताजनक बनलीय… कंपनीच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात साचलेल्या चिखलामुळे समुद्रापर्यंत पोहोचणेही कठीण झालेय.., भाविकांना विसर्जनासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे…
विशेषतः गणेशमूर्ती खांद्यावर घेऊन समुद्रात उतरावे लागणारे भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते… चिखलात पाय रुतणे, तोल जाणे, मूर्ती पडण्याचा धोका किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही… श्रद्धेच्या उत्सवात अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण होणे ही प्रशासनासाठी गंभीर बाब मानली जात आहे…
गेल्या वर्षीही हाच प्रश्न ऐरणीवर आला होता… त्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने चिखल हटविण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो केवळ तात्पुरता ठरला…परिणामी अनेक भाविकांना रेवदंडा मोठे बंदर येथे जाऊन गणेश व देवींचे विसर्जन करावे लागले… यंदाही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचे चित्र दिसत आहे…
गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर “यंदाही प्रशासन शेवटच्या क्षणापर्यंत हातावर हात ठेवून बसणार का?” असा संतप्त प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत…



