नालासोपारा डेपोतील लिकेज बसप्रकरणी मनसे आक्रमक; एसटी प्रशासनाला दिला इशारा

नालासोपारा (प्रतिनिधी – भरत पवार)
नालासोपारा ते श्रीवर्धन दरम्यान धावणाऱ्या एसटी बसच्या दुरावस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नालासोपारा एसटी डेपोत जाऊन आक्रमक पवित्रा घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम डेपोतून रात्री १० वाजता श्रीवर्धनसाठी सुटणाऱ्या एसटी बसमध्ये मोठ्या प्रमाणावर लिकेज (पाणी गळती) होत असल्याचे एका जागृत प्रवाशाच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ श्रीवर्धनचे रहिवासी तसेच मनसे उपशाखा अध्यक्ष योगेश बोर्ले यांना पाठवून परिस्थितीची कल्पना दिली.
योगेश बोर्ले यांनी या घटनेची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर मनसे शहर संघटक रवी दादा यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नालासोपारा एसटी डेपोत प्रत्यक्ष जाऊन बसची पाहणी केली. बसची अत्यंत दयनीय अवस्था पाहून पदाधिकाऱ्यांनी डेपो व्यवस्थापक गावित साहेब यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आणि या प्रकरणी लेखी निवेदन सादर केले.
या वेळी मनसेचे संतोष गुरव यांनी प्रशासनाला कडक इशारा देत सांगितले की, “येत्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होत असून लाखो चाकरमानी आपल्या गावी प्रवासासाठी निघतील. अशा वेळी प्रवाशांसाठी अशा भंगार बस उपलब्ध करून दिल्यास आणि प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न झाल्यास, मनसे ते कधीही सहन करणार नाही. त्या वेळी अशा भंगार बस जागेवरच फोडल्या जातील.”
दरम्यान, या निवेदनानंतर एसटी प्रशासनाकडून सकारात्मक उत्तर मिळाले असून लिकेज बसवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याबद्दल मनसेने एसटी प्रशासनाचे आभारही मानले आहेत.



