गुन्हेगारी

रोहा पोलिसांची अवैध गावठी दारूच्या अड्ड्यांवर धडक कारवाई; अडीच लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त व नष्ट

टिटवी जंगलातील दारूभट्टी उध्वस्त / केळघर परिसरात महिला आरोपींवर कारवाई

 

अक्षता जामकर / रोहा शहर

रोहा : रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांनी दिनांक २३ ऑगस्ट रोजी रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे टिटवी गावच्या जंगल भागात अवैध गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगल भागात छापा टाकला. या कारवाईदरम्यान १२ निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये भरलेले २४०० लीटर दारू तयार करण्याचे रसायन, ॲल्युमिनियमचा दारू गाळण्याचा सतेला, झाकणी आणि १० लीटर तयार गावठी दारू असा एकूण १,५७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुर्गाम जंगल भागामुळे हा अवजड मुद्देमाल आणि रसायन वाहतूक करणे कठीण असल्याने पोलिसांनी प्लास्टिकच्या ड्रमसह सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट केले. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याआधी दिनांक २२ ऑगस्ट रोजी केळघर परिसरातील जंगलात गावठी दारू तयार केली जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी छापा मारला. या ठिकाणी ११ प्लास्टिक ड्रममध्ये २२०० लीटर रसायन आढळून आले, ज्याची किंमत १,१५,५०० रुपये आहे. हा मुद्देमालही दुर्गम भागामुळे जागीच नष्ट करण्यात आला.

या कारवाईत बेलवाडी (ता. रोहा) येथील रहिवासी असलेल्या तीन महिला आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे: चंदा यशवंत झोरे (वय ५० वर्षे), ललिता काशिराम गोरे (वय ४८ वर्षे), रंजना बाबू गोरे (वय ५१ वर्षे), धामनसई येथे दारू विक्री करणाऱ्यास पकडले.

दुसऱ्या एका कारवाईत, धामनसई गावच्या हद्दीत उत्तम सुभाष शेवडे (वय ५५ वर्षे) हा आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे अवैध हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सदर ठिकाणी अचानक रेड टाकून अंदाजे १०,००० रुपये किमतीची १०० लीटर गावठी दारू हस्तगत केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही धडक मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून पोलीस पथकाचे कौतुक केले जात आहे. परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!