श्रीवर्धनमध्ये मोकाट घोड्यांना लगाम; घोड्यांची नोंदणी व टॅगिंग बंधनकारक
घोडागाडी व्यावसायिकांना नगरपरिषदेची तंबी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

अनिकेत मोहित / श्रीवर्धन शहर
श्रीवर्धन शहरात वाढत्या मोकाट घोड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत श्रीवर्धन नगरपरिषदेकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. पर्यटकांचा ओघ कमी झाल्यानंतर काही घोडागाडी व्यावसायिकांकडून घोडे शहरात मोकाट सोडले जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच शेती-बागांचे नुकसान आणि सार्वजनिक ठिकाणी घाण होण्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने आता या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
श्रीवर्धन नगरपरिषदेचे आरोग्य सभापती तथा उपनगराध्यक्ष अनंत गुरव यांनी घोडागाडी व्यावसायिकांना नगरपरिषद कार्यालयात बोलावून मोकाट घोड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत समज देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
यापुढे प्रत्येक घोडामालक आणि त्याच्या घोड्याची नगरपरिषदेकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक घोड्याला ओळख पटण्यासाठी टॅग लावण्याची कार्यवाही करण्यात येणार असून, यासाठी नगरपालिकेमार्फत रानवली येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. घोड्याच्या टॅगवरील क्रमांक आणि संबंधित घोडामालकाची माहिती नगरपरिषदेकडे नोंदविण्यात येणार आहे.
या योजनेची माहिती घेऊन लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले. टॅग नसलेल्या घोड्यांचा घोडागाडी व्यवसायासाठी वापर करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे.
दरम्यान, नोंदणी केलेला घोडा मोकाट सोडून दिल्यामुळे शहरातील नागरिकांच्या शेती-बागेचे नुकसान झाले अथवा सार्वजनिक ठिकाणी घाण केल्याचे आढळून आल्यास संबंधित घोडामालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे घोड्यांची जबाबदारी आता थेट मालकांवर निश्चित होणार आहे.
नगरपरिषदेच्या या निर्णयामुळे श्रीवर्धन शहरातील मोकाट घोड्यांचा प्रश्न नियंत्रणात येऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या अनेक दिवसांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे शहरवासीयांकडून स्वागत व कौतुक होत आहे.



