साडे आठ लाख किमतीचे ५० मोबाईल शोधून खोपोली पोलिसांनी मोबाईल मूळ मालकांकडे केले सुपूर्द

संजय ( सुरज ) यादव – शहर प्रतिनिधी अलिबाग
खोपोली : मोबाईल ही आजच्या काळातील जिव्हाळयाची वस्तू आहे. मात्र तो एकदा चोरीला गेला किंवा हरवला की तो परत मिळेल याची आशाच नसते. खोपोली पोलिसांनी मात्र ५० मोबाईल धारकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळवून देत सुखद धक्का दिला आहे. रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले.
खोपोली परिसरात चोरीला गेलेल्या मोबाईलची खोपोली पोलिसांकडून शोधमोहीम राबवण्यात आली. यासाठी तांत्रिक सर्वकष वापरत हरवलेले मोबाईल शोधून काढण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून ५० मोबाइल शोधून काढले आहेत.
या मोबाईलची किमत ८ लाख ५० हजार रूपये इतकी आहे. रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी बुधवार (१२ जून ) रोजी मोबाईलच्या मालकांना खोपोली पोलिस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले. तसेच खोपोली पोलिसांचेही कौतुक केले आहे.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शीतल राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत व्हारंबळे, पो.ना.सागर शेवते, प्रदिप कुंभार, सतीश बांगर, प्रदीप खरात, देवकाते, राठोड उपस्थित होते.



