जिल्हा

शिक्षकांमुळे ग्रामीण, दुर्गम भागात मुलांना शिक्षण मिळत आहे, त्यांचे आभार कितीही मानले तरी कमीच – पालकमंत्री आदिती तटकरे

परेश दुधाणे – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड

संपूर्ण देश गेली जवळपास दीड वर्ष करोनाच्या संकटाला तोंड देत आहे. मात्र शिक्षकांमुळेच ग्रामीण, दुर्गम भागात मुलांना शिक्षण मिळत आहे, त्यांचे आभार कितीही मानले तरी कमीच आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज कर्जत येथे केले.

रायगड जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने कर्जत येथील शेळके सभागृहात आयोजन करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, महिला बालकल्याण सभापती गीता जाधव, कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, बांधकाम सभापती नीलिमा पाटील, माजी आमदार सुरेश लाड, प्रभाकर म्हात्रे, जि.प.सदस्या उमा मुंडे, नारायण डामसे, ॲड. आस्वाद पाटील, सहारा कोळंबे, रेखा दिसले, पंचायत समिती सभापती सुषमा ठाकरे, पंचायत समिती सदस्या सुजाता मनवे, नगरपरिषदेचे विरोधी गटनेते शरद लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी, रीना पाटील, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा १७७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले प्रतीक जुईकर, आदी प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पुरस्कारार्थी शिक्षक यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सर्वप्रथम आई–वडील आणि गुरुजन वर्गाचे आभार मानले व त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षकांमुळे ग्रामीण, दुर्गम भागात मुलांना शिक्षण मिळत आहे. त्यांचे आभार कितीही मानले तरी कमीच आहे. त्यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांबाबत विविध प्रोत्साहनपर उदाहरणे दिली. राजकीय–सामाजिक क्षेत्रात असल्याने आज आमच्या हातून शिक्षकांचा सत्कार करण्याचे भाग्य लाभले. आतापर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्षेत्रात भरारी घेतली आहे, त्याचे सर्व श्रेय गुरुजनांना जाते.  करोना संकटाच्या पहिल्या टप्प्यात शिक्षकांवर जी जबाबदारी सोपविली होती, ती त्यांनी अगदी काटेकोरपणे पार पाडली म्हणूनच आज आपला रायगड जिल्हा सुरक्षित आहे.

त्या पुढे म्हणाल्या, स्पर्धात्मक कार्यशाळा अलिबाग मध्ये उभारणार असून प्रतीक जुईकर हे भाविष्यात आपल्या रायगड जिल्ह्याचेजिल्हाधिकारी म्हणून आले तर आम्हाला सर्वांना आनंदच होईल. प्रत्येक तालुक्यात 15 शाळा आदर्श करण्याचा संकल्प केला आहे. शाळांमध्ये विविध सोयी–सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. तसेच दि.22 जुलै रोजी महाडमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्यावेळी शिक्षकांनी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, माध्यमिक शाळा अशा सर्वच ठिकाणी जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे मोलाचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याला तोड नाही.

जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्याचा शिक्षकांचा आग्रह होता. यामुळे यावर सर्वांनी विचारविनिमय करून हा सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सतत पाठपुरावा केला. करोना काळात रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, विविध संघटनांनी, शिक्षकांनी महत्वाचे योगदानदिले, याकरिता सर्वजण कौतुकास पात्र आहेत.

आमदार बाळाराम पाटील यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाची रूपरेषा खूप छान केली असून लहान–सहान सर्व बाबींचे  बारकाईने नियोजन केले आहे,  या शब्दात आयोजकांचे कौतुक केले. तरी देखील करोनामध्ये काळजी घ्या. तिसरी लाट येण्याचे संकेत आहेत. त्यात लवकरच शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. करोना काळातआपण खूप शिकलो, ऑनलाइन शिक्षण जरी सुरू केले तरी काही ठिकाणी मोबाईल रेंजची अडचण होती,  त्यामुळे काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. तरी या संकटातही आपण महामारीला समर्थपणे तोंड दिले, परिस्थितीशी सामना केला. करोना काळातकेलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानायला हवेत.  शिक्षकांनी जिल्हा पुरस्कारापर्यंत न थांबता राज्यस्तरीय शिक्षणाचा प्रसार करून राज्यस्तरीय पुरस्कार पटकावयाला हवेत.

यावेळी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आपल्या मनोगतात या दोन वर्षात करोनामध्ये कोणतेच कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते. मात्र शिक्षकांचा आग्रह होता शिक्षक पुरस्कार सोहळा व्हायला हवा. त्यांची विनंती लक्षात घेऊन आज कर्जतमध्ये पुरस्कारसोहळा आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण घेण्यात आले.

याप्रसंगी कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा जामरुंगचे शिक्षक समीर येरूणकर व इतर  शिक्षकांनीही आपलेमनोगत व्यक्त केले. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा १७७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले प्रतीक जुईकर यांनी  आपले मनोगतव्यक्त करताना सांगितले की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकरिता मला अनेकांचे मार्गदर्शन मिळाले. योग्य मार्गदर्शन मिळत गेल्याने मी इथपर्यंत पोहचलो. मला मार्गदर्शन केलेल्या सर्वांचा माझ्या यशात मोलाचा वाटा असून आजचा हा सत्कार सन्मान हीच त्याची पोहोच पावती आहे.  मात्र खरी जबाबदारी आता सुरू होईल.  ती जबाबदारी माझ्या हातून योग्यरितीने पार पाडणे महत्वाचे आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आधी होत्या, यापुढेही असतील, असा विश्वास आहे.

कार्यक्रमाची सुरुवात गायक वैभव थोरवे यांच्या गायनाने झाली तर छत्रपती शिवाजी महाराज, श्री सरस्वती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचा उपाध्यक्ष  सुधाकर घारेयांच्या हस्ते सन्मान चिन्ह, रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

शिक्षक पुरस्कारार्थींची नावे :- अलिबाग–सुभाष मोकल, पेण–अरविंद वाघमारे, पनवेल –सारिका पाटील, अपर्णा गुंड, कर्जत–भास्कर थोरवे, समीर येरूनकर, खालापूर–संतोष पाटील, रजनी गायकवाड, उरण–विलास गावंड, तळा–चंद्रशेखर जुईकर, रोहा– वनिता पवार, महाड– दत्तात्रय कदम, श्रीवर्धन– राजेश तोडणकर, म्हसळा– सुनील पवार, पोलादपूर– आदेश साळवी, माणगाव– सखाराम कदम, मुरुड– आशालता चव्हाण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!