मुंबईत 24 कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेट जप्त, 5 आरोपींना अटक
संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग
मुंबई : डीआरआय मुंबईला विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, न्हावा शेवा बंदरात सिगारेटची तस्करी करणाऱ्या कंटेनरची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार डीआरआयने संशयित कंटेनर ओळखला. या कंटेनरमधून सुमारे 24 कोटी रुपयांचे बंदी घालण्यात आलेले विदेशी सिगारेट जप्त केले आहेत. सिगारेट तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सूत्रांकडून डीआरआयला मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर आशिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये उतरवला जाणार होता. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्या कंटेनरच्या हालचालीवर विशेष नजर ठेवली होती. बंदरातून बाहेर पडल्यानंतर तो कंटेनर ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्याऐवजी खासगी गोदामात नेला जात असल्याचे आढळले.
कंटेनरच्या हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना संशयास्पद हालचाली जाणवल्याने त्यांनी कंटेनर गोदामात अडवला. तपासणीत, डीआरआयच्या अधिकाऱ्यांना 40 फूट कंटेनर विदेशी सिगारेटने भरल्याचे आढळून आले. अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिगारेटच्या आयातीवर भारतात बंदी आहे.
सीमाशुल्क अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यासाठी ही सिगारेट कंटेनरमधून बाहेर काढत त्यात कागदपत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या वस्तू भरण्यात येणार होत्या. तपासणीत गोदामात कागपत्रांमध्ये घोषित केलेला माल यापूर्वीच भरून ठेवण्यात आला होता.
आयात केलेल्या कंटेनरमधून एस्से, मॉन्ड, डनहिल आणि गुडंग गरम या विदेशी सिगारेटच्या 1 कोटी 7 लाख सिगारेट सापडल्या. तसेच यापूर्वी तस्करी करून आणण्यात आलेल्या एस्से लाईट, मॉन्ड या 13 लाख विदेशी सिगारेटचा साठाही सापडला. या कारवाईत एकूण 1 कोटी 20 लाख सिगारेट जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत 24 कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी आयातदारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
बऱ्याच परदेशी सिगारेटला भारतात मोठी मागणी आहे. पण या परदेशी सिगारेटच्या आयातीवर बंदी असल्यामुळे त्यांची तस्करी केली जाते. लॉकडाऊनच्या काळात परदेशी सिगारेटच्या मागणीत प्रचंड वाढ झाली, त्यामुळे या सिगारेटच्या तस्करीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्या काळात दोन महिन्यात 30 कोटी रुपयांच्या सिगारेट न्हावा शेवा बंदरावरून पकडण्यात आल्या होत्या. पण कोरोना काळानंतरही या तस्करीत घट झालेली नाही. मागणी अधिक असल्यामुळे भारतात आजही मोठ्या प्रमाणात या सिगारेटची तस्करी केली जाते. विशेषत: दुबईतून भारतात मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेटची तस्करी केली जाते.



