विनायक मेटे अपघात प्रकरणी फरारी ट्रक चालकाला गुजरातमध्ये अटक, पोलिसांचं मोठं यश
संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग
मुंबई: शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला गुजरातमधील दमन या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. हा ट्रक पालघर मधील असून ट्रक मालकाने ट्रक चालकाची ओळख पटवली आहे. विनायक मेटे यांचा आज पहाटे मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला होता, त्यातच त्यांचे निधन झाले.
आज पहाटे विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात झाला होता, त्यानंतर या अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक चालकाने पोबारा केला होता. दरम्यान, या अपघाताचा तपास करण्यासाठी रायगड पोलिसांनी सहा टीम तयार केल्या होत्या. त्यानंतर या अपघातासाठी कारणीभूत असलेल्या ट्रकची ओळख पटली होती.
ज्या ट्रक बरोबर हा अपघात घडला तो ट्रक पालघर जिल्ह्यातील कासा येथील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या ट्रकचा नंबर DN 09 P 9404 असा असून हा ट्रक आयसर कंपनीचा असल्याची माहिती आहे. या ट्रक चालकाचे नाव उमेश यादव असं असल्याचं सांगितलं जातं. हा ट्रक ताब्यात घेण्यासाठी पालघर पोलीस गुजरातमधील वापी येथे रवाना झाले. त्यांनी ट्रकची ओळख पटविण्यासाठी ट्रक मालकाला सोबत घेतले आणि गुजरातमधून त्या ट्रक चालकाला ताब्यात घेतलं.



