तालुका

रायगड जिल्ह्यातील आगामी निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना – भाजपा एकत्रित लढविणार !

जिल्ह्यात युतीचा झेंडा फडकविणार - आमदार भरत गोगावले

 

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

महाड : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका युतीच्या माध्यमातून एकत्र लढविण्याचा निर्णय बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. त्यादृष्टीने संयुक्त बैठकांना सुरुवातही झाली आहे, महाड येथे या दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर युतीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार यावेळेस बोलताना आ. भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या या संयुक्त बैठकीला आमदार भरतशेठ गोगावले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, बाळासाहेबांच्या शिवेसनेचे तालुकाप्रमुख सुरेश महाडीक, भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन पावले, भाजपचे ज्येष्ठ नेते शेखर ताडफळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळेस बोलताना, भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांनी अडीच वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुचविण्यात आलेली कामे प्रलंबित असल्याची तक्रार करीत, ही कामे मार्गी लागावित यासाठी आपल्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करुन देण्याचे आवाहन आमदार गोगावलेंना केले.

जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर यांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकोप्याने या निवडणुकांना सामोरे जाण्याचे आवाहन यावेळेस केले.

निवडणुकांची रणनिती निश्चित करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी पाच सदस्यांची एक समिती महाड शहरात स्थापन करण्यात येईल, अशी माहिती शहरप्रमुख नितीन पावले यांनी दिली.

आमदार शेठ गोगावले यांनी, अडीच वर्षे राज्यात असलेली सत्ता शिवसेनेच्या अनेक आमदारांना पसंत नसल्यानेच साडेतीन महिन्यांपूर्वी उठाव करावा लागल्याचे आपल्या भाषणात सांगितले. पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी होऊन, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्वाचे विचार पुढे नेण्याचा संकल्प आम्ही सोडला असल्याचेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!