घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प किनारपट्टी भागात राबवावा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामीण प्रगती फाउंडेशनला केली सूचना
गांधी सप्ताहानिमित्त विशेष करोना लसीकरण मोहिमेचे उदघाटन
बंटी पाटील – तालुका प्रतिनिधी अलिबाग
विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करून सामाजिक उत्तरदायित्व निभावणाऱ्या ग्रामीण प्रगती फाउंडेशनने जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील गंभीर समस्या असणाऱ्या घन कचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न करावेत, किनारपट्टी परिसरात घन कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प उभारूननिरोगी आणि स्वच्छ रायगड संकल्पनेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
अलिबाग तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत असणाऱ्या झिराड ग्रामपंचायतीमध्ये गांधी सप्ताहानिमित्त तीन दिवस कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचे उदघाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांच्यासमवेत श्रीमती चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, झिराड ग्रामपंचायतसरपंच दर्शना भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, रायगड जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, ग्रामीण प्रगती फाऊंडेशन चे संस्थापक देवांग नेरला, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात करोनाचा प्रभाव कमी झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये रायगडवासियांनी प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोना लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. शासन लसीकरणासाठी पुढाकार घेत आहेच, त्याचबरोबर खासगी स्वयंसेवी संस्थादेखील पुढे येत आहेत. रायगड जिल्हा करोना लसीकरणामध्ये 100 टक्के लसीकरण करणाराजिल्हा बनविण्यासाठी जनतेने अधिक सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असेही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आवाहन केले.
झिराड ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ग्रामपंचायत हद्दीत असणारी गावे पूर्णतः लसीकरण युक्त झाली आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून लसीकरणाला गती मिळाली आहे. आता ग्रामीण प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना गांधी सप्ताहामध्ये तीन दिवस करोनाचे लसीकरण केले आहे, असे जिल्हा समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी संगितले.



