परिवहन स्थानक ते महामार्ग रस्ता दोन महिन्यात पूर्ण करणार – आमदार भरत गोगावले
सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड
महाड: दि. 23 महाड परिवहन स्थानक ते मुंबई – गोवा महामार्गाला जोडणारा रस्ता येत्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण करण्याची ग्वाही महाडचे आमदार भरत गोगावले यांनी दिली. प्रांत कार्यालयात घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.
गेल्या अनेक वर्षापासून महाड परिवहन स्थानक ते महामार्गाला जोडणाऱ्या या ॲप्रोच रोडची दूरवस्था झाली आहे. यामुळे नगरसेवक, प्रशासनाला वेळोवेळी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. परिवहन महामंडळ व महाड नगर परिषद प्रशासन तर या रस्त्यापुढे हतबल झालेले पहावयास मिळाले होते.
आमदार भरत गोगावले यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून या रस्त्याचे कामासाठी जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आणि 30 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन देखील झाले होते, परंतु तरीही या रस्त्याचे दुष्टचक्र काही संपताना दिसून येत नव्हते.
दरम्यानच्या काळात एस टी प्रशासनाने महाड नगरपरिषदेशी पत्रव्यवहार करून आपण सदर जागेची हद्द कायम करुन, मोजणी करावी आणि त्यानंतरच काम चालू करावे अशी सूचना केली. यामुळे काम ठप्प होणार होते. मात्र, आमदार भरत गोगावले यांनी या रस्त्याच्या कामासंबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी दि.22 प्रांत कार्यालयात तातडीची बैठक लावून सर्व अधिकारी वर्गास आवश्यक ती उपायोजना करून त्वरित या रस्त्याचे काम मार्गी लावण्याचा सूचना दिल्या. त्यानुसार भूमी अभिलेख, परिवहन मंडळ, विद्युत महामंडळ, महसूल विभाग आणि नगरपरिषद या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम चालू करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व प्रक्रिया त्वरित पूर्ण करणार असल्याचे सांगून त्यानुसार ठेकेदारास रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेशही दिले.
या बैठकीला आमदार भरत गोगावले यांच्यासह तहसीलदार सुरेश काशीद, मुख्याधिकारी महादेव रोडगे, विद्युत महामंडळ अधिकारी श्री. केंद्रे, एस टी महामंडळ अधिकारी शिवाजी जाधव, भूमी अभिलेख अधिकारी पी.के.चौधरी, माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर माजी नगरसेवक सुनिल अग्रवाल, नितीन पावले व अन्य कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.



