सहलीसाठी गेलेल्या मुंबईतील खासगी क्लासच्या बसचा बोरघाटात अपघात, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
राकेश देशमुख – जिल्हा प्रतिनिधी रायगड
रायगड: पुणे एक्सप्रेस-वेवर बोरघाटात खाजगी आराम बस पलटी झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तसेच 35 विद्यार्थी यामध्ये जखमी असल्याची माहिती असून त्यांच्यावर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हितिका खन्ना आणि राज म्हात्रे अशी मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत.
मुंबईतील चेंबूर येथील मयांक ट्युटोरिअल्स या खाजगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल मावळ येथील वेट अँड जॉय या थीमपार्कला गेली होती. रविवारी रात्री आठच्या सुमारास मुंबईकडे परतत असताना बोरघाटातील मॅजिक पॉईंटजवळ या खाजगी बसला अपघात होऊन पलटी झाली. या अपघातात त्यामधील सर्वच विद्यार्थी जखमी झाले. त्यामधील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत 35 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मावळ येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या खासगी बसचा हा अपघात झाला आहे. खाजगी क्लासेसच्या 48 विद्यार्थ्यांना घेऊन ही बस सहलीसाठी गेली होती.



