३६३ वा किल्ले प्रतापगड शिवप्रताप दिन सोहळा संपन्न
अभिजीत ढाणिपकर – उपसंपादक कोकण विभाग
शिवकालीन धाडसी खेळ आणि शिवमय वातावरणात किल्ले प्रतापगड येथे शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

किल्ले प्रतापगडावर असंख्य शिवभक्तांसमवेत ३६३ वा शिवप्रतापदिन सोहळा उत्साहात साजरा केला, शिवकालीन गड – किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा याप्रसंगी केली, किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचा १०० कोटींचा आराखडा शासनाकडे तयार असून या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी तात्काळ देणार असल्याचेही यासमयी जाहिर केले.

राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहे, प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत, हे सरकार सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे, राज्यातील गडकोट-किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचेही याप्रसंगी नमूद केले.
किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण केले. त्यानंतर भवानी मातेची मनोभावे आरती करण्यात आली. छत्रपती शिवरायांची मूर्ती ठेवण्यात आलेल्या पालखीचे पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने मानवंदना दिली तर प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला.

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार महादेव जानकर,आमदार भरत गोगावले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



