जागतिक महिलादिन निमित्त रोहिदास महिला मंडळ मार्फत राजेवाडी येथील स्वराज्य फाऊंडेशन वृध्दश्रम येथे साहित्य वाटप
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड : जागतिक महिलादिन निमित्त रोहिदास महिला मंडळ मार्फत राजेवाडी येथील स्वराज्य फाऊंडेशन वृध्दश्रम येथील महिलांना साहित्य वाटप करण्यात आले.
क्लारा झेटकीन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला. याचं बीज रोवलं गेलं ते 1908 साली जेव्हा 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या मागण्या होत्या.
यानंतर एका वर्षाने सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली. हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आणली ती क्लारा झेटकीन या महिलेने. त्या साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या होत्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या. त्यांनी ही कल्पना सर्वप्रथम काम/नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेनहेगनमध्ये 1910 साली मांडली होती.
त्या परिषदेला 17 देशांमधून 100 महिला उपस्थित होत्या. सगळ्यांनी क्लारा यांची कल्पना एकमुखाने मान्य केली.
त्यानुसार पहिला जागतिक महिला दिवस 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये साजरा केला गेला होता. त्याची शताब्दी 2011 साली साजरी झाली.

महिला दिवसाला संयुक्त राष्ट्रांची अधिकृत मान्यता 1975 साली मिळाली, तर प्रत्येक वर्षांची खास थीम स्वीकारायला सुरुवात झाली 1996 साली. पहिलं घोषवाक्य होतं – ‘भूतकाळ साजरा करताना भविष्याची धोरणं ठरवणं.’
सध्या जागतिक महिला दिन हा महिलांच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचे मैलाचे दगड साजरे करण्याच्या उद्देशाने सर्वत्र साजरा केला जातो.
तसंच या दिवशी अजूनही समाजात अस्तित्वात असलेल्या असमानतेविरोधात निदर्शनंही केली जातात.
या वेळी रोहिदास महिला मंडळ अध्यक्षा शितल राजेंद्र बिरवाडकर, उपाध्यक्ष जयश्री दुर्गेश गोरेगावकर, सेक्रेटरी उमा लाजारस कांबळे व महिला अधिकारी आणि सदस्य उपस्थित होत्या.



