मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर येथे शासन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ
अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक महाराष्ट्र राज्य
पालघर : शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा पुढचा टप्पा पालघर जिल्ह्यात पार पडला. यावेळी या आदिवासीबहुल जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले.
पालघर जिल्ह्यात शासन आपल्या दारी योजनेच्या सोबतच पालघरमध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यातून २ ते ३ हजार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार असे मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी सांगितले.
राज्यात युती सरकार आल्यापासून झालेल्या प्रत्येक कॅबिनेट बैठकीत सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शासन आपल्या दारी या उपक्रमातून हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असल्याचे प्रतिबिंब उमटत असून त्यामुळेच १२०० कोटीहून अधिक रुपयांचा लाभ या उपक्रमाद्वारे मिळवून देण्यात येणार आहे असे ही त्यांनी सांगितले.
पालघर मध्ये नवीन रुग्णालय आणि पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले असून त्याद्वारे येथील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासोबतच मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक आधी वर्सोवा ते विरार आणि पुढे पालघरला जोडण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना स्पष्ट केले. पालघर जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांसाठी राज्य अर्थसंकल्पात महत्वाचे निर्णय घेतले आहेत तसेच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. प्रधानमंत्री योजनेनुसार ६ हजार रुपये अनुदान राज्याकडून देणे, एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत करणे, सततच्या पावसाला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देणे या सगळ्यांचा लाभ येथील नागरिकांना मिळाला असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात झालेली युती ही स्वार्थासाठी झालेली युती नसून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झालेली आहे. त्यामुळे माझ्यात आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध हे फेविकॉल का मजबूत जोड आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी ती तुटणार नाही असे यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मी आणि देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करणारे कार्यकर्ते असून आमचे सरकार हे घरी बसून काम करणारे सरकार नव्हे तर ऍक्शन मोडवर काम करणारे सरकार आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे सहकार्य आणि आशीर्वाद या सरकारला मिळाले असून नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात त्यांना ८४ टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा केंद्रात मोदी यांच्याच नेतृत्वाखाली सरकार बनेल असे यासमयी निक्षून मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार श्रीनिवास वनगा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष विवेक पंडित, मा.आमदार रवींद्र फाटक, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, वसई विरार मनपाचे आयुक्त अनिल पवार, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच सर्व सरपंच पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो लाभार्थी उपस्थित होते.



