‘शासन आपल्या दारी’ या राज्य शासनाच्या महत्वाच्या अभियानाचा पुढचा टप्पा जळगाव येथे संपन्न
अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक महाराष्ट्र राज्य
शासनाच्या अत्यंत महत्वपूर्ण अशा “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचा पुढचा टप्पा जळगाव येथे पार पडला. या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील २ लाख ५३ हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले.
केळी, कापूस आणि कविता पिकविणा-या जळगाव जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे याचा विशेष आनंद होत असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत सर्व योजनांचे लाभ एकत्र मिळत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे असेही त्यांनी सांगितले.
तसेच या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की गेल्या एक वर्षात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. सतत च्या पावसामुळे झालेले नुकसान नैसर्गिक आपत्ती म्हणून धरले असून १५०० कोटी रूपयांची नुकसान भरपाई दिली. शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणा-या प्रत्येक शेतक-याला ५० हजार रूपये प्रोत्साहन रक्कम दिली. लेक लाडकी लखपती योजना सुरू केली. शासकीय योजनांचा लाभ घेऊन सरपंचांनी आपले गाव स्वच्छ व समृद्ध करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातील केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची घोषणा यासमयी मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच बोदवड उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देणार असेही याप्रसंगी जाहीर केले.
महिला सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय शासन घेणार असून त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल करण्यासाठी शासन बचतगटांच्या सक्षमीकरण करण्याकडे लक्ष देणार असल्याचे यावेळी त्यांनी व्यक्त केले.
स्थानिक लोकप्रतिनिधीची मागणी लक्षात घेऊन जळगाव येथे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही यावेळी जाहीर त्यांनी जाहीर केले.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पाणीपुरवठा आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार , खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार लता सोनावणे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश गोळे,आमदार संजय सावकारे तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि भाजपा,शिवसेना युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, लाभार्थी व जळगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



