कृषीवार्ता

अनियमित पावसामुळे विस्कटलेली शेती आता पुन्हा बहरली; श्रीवर्धन तालुक्यात भात लावणीला वेग

 

श्रीवर्धन प्रतिनिधी अनिकेत मोहित

श्रीवर्धन तालुक्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्यानंतर भात लावणीच्या कामांना चांगलाच वेग आला असून सर्वत्र शेतात लगबगीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा सुरुवातीच्या काळात अनियमित आणि अपुऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी पेरलेले बियाणे उगवले नाही, तर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती.

मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी कुटुंबे पारंपरिक पद्धतीने भात लावणी करताना दिसत असून शेतांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

चिखल-मातीमध्ये दिवसभर राबणारा बळीराजा आणि त्याला साथ देणाऱ्या महिला पारंपरिक भातलावणीची गाणी गात शेतीची कामे करत आहेत. ही गाणी केवळ श्रम हलके करण्यासाठी नसून, अस्मानी संकटांपासून पिकांचे रक्षण व्हावे, भरघोस उत्पादन मिळावे आणि निसर्गाची कृपा कायम राहावी, अशी भावपूर्ण प्रार्थना त्यातून व्यक्त होत असते.

कोकणातील भात लावणी ही केवळ शेतीची प्रक्रिया नसून ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेले नाते जपणारा एक सांस्कृतिक वारसा आहे. समाधानकारक पावसामुळे यंदाच्या हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या असून, पुढील काळातही पावसाची साथ कायम राहावी, अशीच आशा बळीराजा व्यक्त करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!