महाड मतदार संघाच्या सर्वांगिण विकासावर भर – आमदार भरतशेठ गोगावले
दासगांव - गोठे पुलाच्या जागेची पाहणी
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : महाड विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगिण विकासावर आपण भर दिला आहे. गेल्या वर्षभराच्या काळात त्यासाठी आपण शासनाकडून पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन घेतला आहे, अशी माहिती महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली.
मुंबई- गोवा महामार्गावरील दासगाव आणि महाड तालुक्याच्या खाडीपट्टा विभागातील गोठे या गावाला जोडणाऱ्या रस्ता आणि सावित्री नदीवरील पुलाच्या कामास मंजुरी मिळाली आहे. या पुलामुळे महाड तालुक्यातील विन्हेरे आणि खाडीपट्टा विभागातील अंतर तीस ते चाळीस किलो मीटरने कमी होणार आहे. महाड तालुक्यातील सुमारे ८४ गावांना याचा फायदा होणार आहे. आ. गोगावले यांनी दासगाव येथे पुलाच्या प्रस्तावित जागेला अधिकारी वर्गासह भेट देवून पाहणी केली. यावेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नामदे , उपअभियंता उळागड्डे त्यांच्यासमवेत होते. या पाहणीतनंतर दासगांव येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
पावसाळा संपल्यानंतर भूसंपादन आणि अन्य बाबींची पूर्तता करुन या ठिकाणी कामास प्रारंभ करण्यात येईल असे आ. गोगावले यांनी सांगितले.
महाड शहरातून महामार्गाकडे जाणार्या गांधारी नदीवरील पुलाचे काम पावसाळा संपताच हाती घेण्यात येणार असून, पुढील पावसाळ्यापर्यंत ते काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे आ. गोगावले यांनी सांगितले.
दादली पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. या ठिकाणी पुलाची सध्याची जागा बदलून तो पूल अधिक उंच करण्यात येणार असल्याची माहिती देखील आ. गोगावले यांनी दिली.
महाड शहरातील विविध भागांतील रस्त्यांच्या विकासासाठी त्याच प्रमाणे अन्य विकास कामांसाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. अशी माहितीही त्यांनी यावेळेस दिली.
खाडीपट्टा विभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आपण पावले उचलली आहेत. असेही त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.
आमदारांना देण्यात येणार्या निधीपोटी सर्वाधिक निधी आपल्याला मिळाला आहे. त्या माध्यमातून मतदार संघात जास्तीत जास्त कामे करण्यावर आपला भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या जागेची पाहणी आणि पत्रकार परिषद प्रसंगी महाड शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे, दासगांवचे माजी सरपंच दिलीप उकिर्डे, माजी जि.प. सदस्य ताठरे, सिध्देश पाटेकर, सुयेब पाचकर, नितीन आर्ते, सुनिल अगरवाल, दीपक सावंत, अमीर देशमुख आदी उपस्थित होते.



