कृषीवार्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करुन घ्यावी

 

अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक महाराष्ट्र राज्य

रायगड: दि.09 पी.एम. किसान योजनेचा 16 वा हप्त्याचा लाभ जानेवारी महिन्यात वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा 16 वा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यास्तव पी.एम. किसान योजनेच्या निकषांच्या अधिन राहून योजनेच्या लाभासाठी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आवश्यक बाबींची पूर्तता घ्यावी, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय पुणे दिलीप झेंडे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे eKYC केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यास अद्यापही वाव असल्याने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि.6 डिसेंबर, 2023 ते दि.15 जानेवारी, 2024 या कालावधीत गावपातळीवर 45 दिवसांची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने डॉ.वीण गेडाम आयुक्त कृषी यांनी महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांनी सर्व समन्वयाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी.एम.किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व eKYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.

पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता केलेल्या लाभार्थींनाच योजनेचा लाभ केंद्र शासन अदा करत आहे. त्यामुळे भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न लाभार्थींनी सदर बाबींची पूर्तता करून घ्यावी. यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या (Land Seeding – No) लाभार्थींनी संबंधित तलाठी/तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. त्याचप्रमाणे eKYC व बँक खाती आधार संलग्न करणे यासाठी अनुक्रमे नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र (CSC) व इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या मार्फत कार्य पूर्तता करावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे पूर्तता करण्यासाठी गावच्या ग्रामस्तरीय नोडल अधिकारी / कृषी सहाय्यक यांची मदत घ्यावी.

अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!