22 जानेवारीला महाराष्ट्र राज्यात शासकीय सुट्टी जाहीर
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
महाराष्ट्र : साऱ्या देशाचं लक्ष भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागलं आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. शुभ मुहूर्तावर रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होणार असून त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या बालरुपाचं दर्शन घडणार आहे. देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा उत्सव फक्त अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशभरात पाहायला मिळणार आहे. देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक राज्यांमध्ये शासकीय सुट्टी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकारकडून यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून 22 जानेवारीला शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये तसेच निम-शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
22 जानेवारी रोजी रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह आणि आनंद देशभर पाहायला मिळणार आहे. 22 जानेवारीला देशात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.



