चेंबूर, मुंबई येथील निवासी शाळा व नूतन वसतिगृहाच्या लोकार्पण सोहळा संपन्न
अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक महाराष्ट्र राज्य
मुंबई तील चेंबूर परिसरात २५० क्षमतेच्या मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी तयार करण्यात आलेल्या शाळा व नूतन वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनाच्या मुहूर्तावरच आज दूरदृश्यप्रणालीद्वारे मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे मंगरुळपीर येथील शासकीय वसतिगृह तसेच जि. वाशिम व बार्टी अंतर्गत येरवडा संकुल पुणे येथील UPSC चे निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच या प्रसंगी समान संधी केंद्र उपक्रमाच्या मोबाईल ऍपचे उद्घाटन करण्यात आले.
छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणातून सामजिक उन्नती साधण्यावर भर दिला होता.आज आपण त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रयतेचे पालक म्हणून काम केले.
बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून सर्व घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे. शासनाच्या सर्व संबंधित विभागांमार्फत विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
मुंबईतील एसआरएसारख्या रखडलेल्या प्रकल्पामुळे नागरिक मुंबईबाहेर फेकले गेले आहेत. सरकारच्या माध्यमातून संबंधित संस्थांना सोबत घेऊन मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तसेच चेंबूर परिसरातील विविध कारणांमुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जातील असेही यासमयी बोलताना आश्वस्त केले.आज उद्घाटन झालेल्या या वसतिगृहाला ‘माता रमाई’ यांचे नाव देण्याची घोषणाही याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आणि बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले तसेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



