मेघरे ग्रुप ग्रामपंचायतीचे वृक्षलागवड अभियान उत्साहात; पर्यावरण संवर्धनाचा दिला जागर

श्रीवर्धन | प्रतिनिधी अनिकेत मोहित
ग्रुप ग्रामपंचायत मेघरे (ता. श्रीवर्धन, जि. रायगड) तर्फे आयोजित “वृक्षलागवड अभियान २०२६” चा शुभारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला या उपक्रमात ग्रामस्थ, पदाधिकारी, महिला आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रत्यक्ष मातीत रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
हरित क्षेत्र वाढवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी परिसर निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली असून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही स्थानिक स्तरावर स्वीकारण्यात आली.

या प्रसंगी गटविकास अधिकारी राजेंद्र किरावे, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वृक्षलागवड ही केवळ औपचारिकता नसून ती पर्यावरणाशी असलेली सामाजिक बांधिलकी असल्याचे मत व्यक्त केले.

विशेष म्हणजे, या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचेही वाटप करण्यात आले. वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आदी शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. पर्यावरण संवर्धनासोबतच शिक्षणाला चालना देण्याचा दुहेरी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांनी पुढील काळातही अशाच पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
मेघरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे “एक झाड – एक जबाबदारी” हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला असून, ग्रामीण भागातून पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणासाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद मानले जात आहे.



