तालुका

श्रीवर्धन पोलिसांची वाहतूक शिस्त मोहिम प्रभावी; नियमभंग करणाऱ्यांकडून ३ लाख ९० हजारांचा दंड वसूल

 

श्रीवर्धन | प्रतिनिधी अनिकेत मोहित

श्रीवर्धन शहरात वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेला चांगले यश मिळत असून, विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. ड्रिंक अँड ड्राइव्ह, रस्त्यामध्ये वाहन लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, विनाहेल्मेट वाहन चालवणे, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणे तसेच विनापरवाना वाहन चालवणे अशा प्रकारच्या कारवायांमधून एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या मोहिमेबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक श्री. सुरेंद्र गरड यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. “वाहतूक नियम हे केवळ दंडासाठी नसून प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आहेत. नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि सर्वांसाठी रस्ते अधिक सुरक्षित बनतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या श्रीवर्धन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य बाजारपेठ, प्रमुख रस्ते, प्रवेशद्वार आणि इतर जास्त रहदारीच्या ठिकाणी पोलिसांकडून नियमित गस्त घालण्यात येत आहे. या सततच्या उपस्थितीमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाल्याचे नागरिकांकडूनही सांगितले जात आहे. विशेषतः बाजारपेठ परिसरात अनियमित पार्किंग आणि बेफिकीर वाहनचालकांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.

वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून स्थानिक महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, अल्पवयीनांनी वाहन न चालवणे, वेगमर्यादेचे पालन करणे तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे गंभीर परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पावसाळ्यामुळे सध्या श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची संख्या तुलनेने कमी असली, तरी पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढतो. हे लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने भविष्यासाठीही नियोजन सुरू केले असून, पर्यटकांची संख्या वाढल्यास गस्त अधिक वाढविणे, पार्किंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे, वाहतूक नियमभंगावरील कारवाई अधिक कठोर करणे आणि जनजागृती मोहीम राबविणे अशा उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

श्रीवर्धन पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाई न करता शहरात शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. वाढती वाहतूक, पर्यटनाचा ताण आणि रस्ते सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद मानली जात आहे. नागरिकांनीही या उपक्रमाला सहकार्य करून वाहतूक नियम पाळणे, नियमबद्ध पार्किंग करणे आणि जबाबदारीने वाहन चालविण्याची सवय अंगीकारल्यास “सुरक्षित श्रीवर्धन, शिस्तबद्ध श्रीवर्धन” हे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!