शहर

श्रीवर्धनमध्ये ६१ लाखांचे व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त; तिघांवर गुन्हा

पार नाक्यावर पोलिसांची कारवाई; ६०४ ग्रॅम वजनाचा साठा ताब्यात

 

अनिकेत मोहित / शहर प्रतिनिधी श्रीवर्धन

श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित आणि अत्यंत मौल्यवान मानल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) अवैध वाहतूक व विक्री करण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. पार नाका परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी ६०४ ग्रॅम अंबरग्रीस जप्त केले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत ६१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पार नाका परिसरात पोलिसांनी संशयास्पदरीत्या मोटारसायकलवरून जाणाऱ्या विराज महेंद्र चौलकर (२५, रा. वरचा जिवणा कोळीवाडा, श्रीवर्धन) याला थांबवून झडती घेतली. त्याच्याकडील काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत सुगंधी मेणासारखा काळ्या रंगाचा पदार्थ आढळून आला. तपासणीअंती हा पदार्थ अंबरग्रीस असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी चौलकर याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा माल ऋतुराज रामचंद्र रघुवीर (१९) आणि रामचंद्र जया रघुवीर (४८, दोघे रा. खालचा जिवणा कोळीवाडा, श्रीवर्धन) यांच्याकडून आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आर्थिक फायद्यासाठी अंबरग्रीसची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा वाहतूक केला जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी दादासाहेब सदाशिव खिल्लारी (२९) यांच्या तक्रारीवरून श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१६१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील कलम २(३२), ३९(डी), ३९(३)(अ), ४०, ४४, ४८(ए), ५० आणि ५१ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत. जप्त करण्यात आलेल्या अंबरग्रीसचा स्रोत, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!