प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अंध विद्यालयाला सदिच्छा भेट
फ्रीडम ग्रुप महाड आणि महाड शहर किराणा व्यापारी संघाचा स्तुत्य उपक्रम
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड दि. 28 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून फ्रीडम ग्रुप महाड आणि महाड शहर किराणा व्यापारी संघा तर्फे मडणगड तालुक्यातील स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाला भेट देऊन त्यांना महिना भर पुरेल एवढं किराणा सामान आणि खाऊचे वाटप करून दिवस त्या मुला सोबत घालावीला.

गेली 10 वर्षे फ्रीडम ग्रुप महाड अनेक समाजिक उपक्रम राबवित आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी काहीतरी समाजासाठी काहीतरी करण्याचा ग्रुप चा मानस असतो. ह्या वर्षी त्यांना साथ मिळाली ती महाड शहर किराणा व्यापारी संघाची. शाळेमध्ये गेल्या नंतर विद्यार्थ्यांनी सर्वांचे स्वागत अतिशय सुंदर गीत गाऊन केले.
माणसाच्या जीवनात रोजच सूर्य उगवतो व मावळतो, दिवसाचा प्रकाश व रात्रीचा काळोख असतो. परंतु ज्यांनी प्रकाशच पाहिला नाही, अशांना प्रकाश व रात्रीच्या काळोखाची किंमत सारखीच असल्याची भावना त्यांच्या मनात असते. दिवस असो की रात्र अंधांच्या आयुष्यात कायमचाच अंधार असतो. असे असले तरीही जगण्याची उमेद मात्र कायम असते.
दृष्टीहीन मुलेही बुद्धीने तल्लख असतात, हे अंधत्त्वावर मात करुन स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय, घराडी येथील मुलांनी दाखवून दिले आहे. या अंध मुलांच्या जीवनात प्रकाशाची पहाट येण्यासाठी समाजाने नेत्रदानासाठी पुढे येण्याची गरज आहे.
मंडणगड तालुक्यातील घराडी या छोट्याशा खेडेगावात आशाताई कामत व प्रतिभा सेनगुप्ता या दोन बहिणींनी मिळून १२ वर्षांपूर्वी कोकणातील पहिली अंध शाळा सुरु केली. सुरुवातीच्या काळात अंध शाळेत मुले पाठविण्यासाठी पालक तयार होत नव्हते. २००२ साली चार अंध मुलांना एकत्र करुन छोट्याशा घरात ही अंध निवासी शाळा सुरु झाली. आज या शाळेत ३० मुले आहेत.
अनेक मुले या शाळेत शिक्षण घेऊन बाहेर पडली. स्नेहज्योती अंध निवासी विद्यालयात आता आठवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. या अंध निवासी शाळेला शासनाची ८वीपर्यंतची मान्यता आहे. समाजातील दानशूर व्यक्तीनी दिलेल्या देणगीतून स्नेहज्योती अंध निवासी विद्यालयाची घोडदौड सुरु आहे. दानशूर व्यक्तीनी दिलेल्या देणगीतून शाळेला मदत मिळाली.
अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे ह्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी अभ्यासात देखील अतिशय हुशार आहेत, ते उत्तम गायन आणि वाद्य वाजवतात.



