पालकमंत्र्यांच्या हस्ते परिवर्तन कार्यपुस्तिकेच्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन संपन्न
स्वप्नील ढवण – उपसंपादक
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जानेवारी ते एप्रिल 2022 या कालावधीत जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामकाजाची मांडणी परिवर्तन या दुसऱ्या अंकाद्वारे सर्वांसमोर करण्यात आली, या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपरपोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
प्रशासन म्हणून जनतेच्या जीवनात खरा बदल घडवून आणण्यासाठी, अगदी शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलविण्यासाठी ऑगस्ट–सप्टेंबर 2021 महिन्यात रायगड जिल्हा प्रशासनातील सर्वांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून परिवर्तन घडवून आणण्याची खूणगाठ मनाशी बांधली होती, त्यानुसार जिल्हा प्रशासन शेतकरी, कातकरी आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कातकरी उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्री उपक्रम, जिल्ह्यातील युवक–युवर्तीमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी जागरूकता वाढण्यासाठी गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ही संकल्पना आणि निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी माझी वसुंधरा हे अभियान राबवित आहे. जिल्हा प्रशासन करीत असलेल्या कामांची सचित्र मांडणी परिवर्तन याअंकाद्वारे दर चार महिन्यांनी प्रकाशित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2021 या चार महिन्यात जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचा मागोवा घेणाऱ्या परिवर्तन कार्यपुस्तिकेच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन दि. 26 जानेवारी 2022 रोजी पालकमंत्री आदिती तटकरे व इतर अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.
सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात माझी वसुंधरा, कातकरी उत्थान अभियान आणि गरुडझेप स्पर्धा परिक्षा केंद्र हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.



