जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी
महाड येथे मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न; मोठ्या प्रमाणात केली बांबू व इतर वृक्षलागवड
विशाल मोहिते / जिल्हा प्रतिनिधी रायगड
मान्सून सुरू झाला आहे, गेली दोन वर्ष रायगड जिल्ह्याने अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड दिले आहे, या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या मान्सूनमध्ये जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची जय्यत तयारी सुरू आहे, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये सज्ज राहून कोणतीही जीवित हानी व अन्य कोणतीही हानी होणार नाही, यासाठी दक्षराहण्याचा जिल्हा प्रशासनाने निश्चय केला आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, नवी मुंबई परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, रोहा उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, इतर सर्व विभागांचे विभागप्रमुख, कार्यालय प्रमुख यांचीही उत्कृष्ठ साथ मिळत आहे.

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी दि. 17 जून रोजी प्रभारी उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के–पाटील, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्या समन्वयातून जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक महाडमध्ये संपन्न झाली. या बैठकी दरम्यान महाड मधील पूराच्या व दरडप्रवण क्षेत्राच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनाव सुरू असलेली तयारी यांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

यावेळी महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, उप विभागीय पोलिस अधिकारी निलेश तांबे, नगरपालिका मुख्याधिकारी महादेव रोडगे, गट विकास अधिकारी श्री. पोळ, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्री. बुरले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित असलेल्या विषयांचे विस्तृत सादरीकरण केले.
याशिवाय उपस्थित विविध शासकीय अधिकारी, महाड वनविभाग, ग्रामस्थ यांच्या सहाय्याने चांढवे खु., मोरेवाडी शिंगरकोंड, दरडप्रवण गावांमध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) विभागाच्या सूचनांनुसार बांबू व विविध वृक्ष लागवड करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरडग्रस्त तसेच जिल्ह्याच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर वृक्ष व बांबू लागवड करण्याचा संकल्प केला आहे.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांच्या अहवालात दरडप्रवण क्षेत्रात भू:स्स्खलन आणि दरड पडण्याचा धोका कमी करण्याकरिता रायगड जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. सन 2022 मध्ये रायगड जिल्हा परिषदेद्वारे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बांबू लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच शाळा कॉलेज व इतर शासकीय व अशासकीय संस्थांद्वारे तसेच सामाजिक वनीकरण विभागाद्वारे मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीचे नियोजन आहे.
महाड व पोलादपूर तालुक्यातील तळीये, मधलीवाडी, ता.महाड – 5 हेक्टर, तळीये, तळीये, ता. महाड – 4 हेक्टर, मोरेवाडी, (शिंगरकोंड), ता. महाड – 10 हेक्टर, चांडवे खुर्द ता. महाड – 10 हेक्टर, साखर, चव्हाण वाडी, ता. पोलादपूर – 11 हेक्टर, साखर आदिवासी वाडी, ता. पोलादपूर – 5 हेक्टर, साखर, पेढे वाडी, ता. पोलादपूर – 5 हेक्टर या गावात प्राधान्याने बांबू लागवड करण्यात येणार आहे.



