कृषीवार्ता

शेतकऱ्यांनी 1 रुपया भरुन सर्वसमावेशक पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा

 

मिलिंद पवार – शहर जिल्हा प्रतिनिधी रायगड 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. शेतकऱ्यांच्या हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. खरीप व रब्बी हंगाम 2023-24 कालावधीत या आर्थिक वर्षापासून 23 जून 2023 च्या शासन निर्णयानुसार सर्वसमावेशक पिक विमा योजना ही राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. खोपोली उपविभागातील खालापूर, कर्जत, पनवेल व उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भात (धान) व नाचणी (रागी) या पिकांसाठी विमा हप्ता भरावा. जेणेकरुन पीकाचं आकस्मिक जोखमीमुळे नुकसान झाल्यास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लाभ मिळेल. जोखमीच्या बाबींमध्ये हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीठ, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग यांचा व्यापक प्रादूर्भाव इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक आपत्तीमुळे (नैसर्गिक ) पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान या घटकांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल (http://pmfby.gov.in ), सामुदायिक सुविधा केंद्र (CSC) बँकेमार्फत या योजनेत 1 रुपया भरून सहभाग नोंदवावा. हा अर्ज भरताना ई-पीक पाहणी अंतर्गत नोंदणी असलेला 7/12 व 8-अ, आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील तसेच कुळाने/भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकरार पिक विमा पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे विमा काढण्यांत येवू नये. पिक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम 40 रुपये देण्यात येते. शेतकऱ्यांनी 1 रुपया व्यतिरिक्त इतर कोणतेही अतिरिक्त शुल्क जमा करू नये.

तरी सर्व शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पूर्वी योजनेत सहभाग नोंदवावा. तसेच यासंबधी अधिक माहिती हवी असल्यास नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी, खोपोली एन.व्ही. फुलसुंदर यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!