रायगड जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
रायगड : मुंबई, पुण्यासह राज्यभर पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. राज्यभरात आज पावसाने धुमाकूळ घातलाय. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज (19 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या चार दिवसापासून रायगडला अक्षरशः पावसाने झोडपलेला आहे. तसेच विविध भागांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत. रायगड जिल्ह्यातील चारही नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड भोईघाट येथील सावित्री नदी मही कावती मंदिर येथील सावित्रीचे पात्र भरले असून या घाटाला पाणी लागले आहे. तर रोहा मधील नागोठणे येथील बंधाऱ्यावरील अंबा नदी सध्या इशारा पातळीवर वाहते रोहे मधील शहरातून वाहणारी डोहवाल बंधारा येथील कुंडलिका नदी ही सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रायगड जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी हा निर्णय घेतला.



