सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड: सीपीआर देत बेशुद्ध पडलेल्या माकडाच्या पिल्लाचा जीव वाचविण्याची किमया नांगलवाडी येथील दशरथ जाधव यांनी करून दाखवित मानवतेचे दर्शन घडविले आहे.
रविवारी २३ जुलै रोजी नांगलवाडी येथेन हे मानवतेच दर्शन पहायला मिळाले. माकडाचे एक लहान पिल्लू एका इमारतीमधून दुसऱ्या इमारतीमध्ये विजेच्या खांबावरुन जात होते. अचानक त्याचा पाय जिवंत वीज प्रवाह असलेल्या तारेत अडकला. तेथे शॉर्टसर्किट झाले आणि हे पिल्लू बेशुद्ध होवून रस्त्यावर कोसळले. बेशुद्ध आणि मरणासन्न स्थितीत असलेल्या या पिल्लाकडे पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करित होते.
त्याच वेळेस हा सर्व प्रकार पाहात असलेले दशरथ जाधव पुढे आले. या पिल्लामध्ये असलेली धाकधुकी पाहून त्यांनी या पिल्लाला सीपीआर देण्याचा निर्णय घेतला. या पिल्लाच्या छातीवर आपल्या दोन्ही हातांनी दाब देत त्यानी या पिल्लाची बंद पडत चाललेली ह्दयक्रिया पुन्हा सुरु करण्यात यश मिळविले. अवघ्या काही क्षणातच हे पिल्लू शुद्धीवर आले. समयसूचकता दाखवित दशरथ जाधव यांनी या पिल्लाला जीवदान दिले आहे.
एका मुक्या प्राण्याला सीपीआर देत त्याला जीवदान देणाऱ्या दशरथ जाधव यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



