ब्रेकिंग

मनसेच्या दणक्याने कामगारांना मिळाला न्याय / कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण

कामगार गेल्या दहा वर्षापासून हक्काच्या रजा आणि सवलतीसाठी वंचित

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : गुरुवार दि. 27 जुलै 2023 रोजी महाड औद्योगिक क्षेत्र परिसरातील आस्था क्लीनरूम सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यामध्ये मागील दहा वर्षापासून कामगारांचे शोषण चालू होते, परंतु व्यवस्थापनाच्या दबावाला बळी पडून कोणीही बोलायला तयार नव्हते. दहा वर्षापासूनच्या तसेच नव्याने कायमस्वरूपी झालेल्या कामगार व कर्मचाऱ्यांना साधी किरकोळ रजा मिळत नव्हती व कामगार कायद्यानुसार ग्राह्य अन्य सवलतींचा देखील लाभ मिळत नव्हता. एखाद्या कामगारास प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरी जावे लागले तरीसुद्धा त्याची वेतन कपात केली जात होती. अशाप्रकारे कोणत्याही कामगारास एकही रजा या मुजोर व्यवस्थापनातर्फे देण्यात येत नव्हती, व्यवस्थापनाच्या भीतीने येथील कामगार गप्प होते. मात्र याच युनिट मधील तनुजा शेडगे या एका कामगार तरुणीला ही बाब खटकली तिने या कारणास्तव नोकरीवर पाणी सोडले आणि कामगारांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. याबाबत तिने मनसेचे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर, मनसे कामगार संघटनेचे प्रमोद उतेकर व महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे, शहर उपाध्यक्ष अभिजीत पोटे यांच्याशी संपर्क साधून कामगारांची व्यथा सांगितली. तेथील कामगारांना न्याय मिळावा ही मनोमन तिची प्रामाणिक इच्छा होती. तिची व्यथा जाणून चेतन उतेकर यांनी सहकाऱ्यांच्या साथीने व्यवस्थापनाला पत्र लिहून जाब विचारला तसेच तातडीने कामगार कायद्यानुसार व्यवस्थापनाने सवलती जाहीर केल्या नाहीत तर मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल असे त्यांनी व्यवस्थापनाला ठणकावून सांगितले. याची दखल घेऊन व्यवस्थापनाने सर्व कामगारांना त्यांच्या हक्काच्या रजा व सवलती मंजूर केल्या.

ही घोषणा होताच कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. एकमेकांना पेढे भरवून त्यांनी हा आनंद साजरा केला. गेले दहा वर्षापासून न्याय हक्कापासून वंचित राहिलेल्या या कामगारांना मनसेने न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्व कामगारांनी यावेळी मनसेचे धन्यवाद मानले.

कोणत्याही कामगारांनी व्यवस्थापनाच्या दबावाला बळी न पडता आपल्या न्याय हक्कासाठी उठाव केलाच पाहिजे आणि महाड औद्योगिक क्षेत्रातील कोणत्याही कामगारांवर अशा प्रकारचा दबाव अथवा गळचेपी होत असेल तर त्यांनी मनसेशी संपर्क साधावा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू असे चेतन उतेकर यांनी यावेळी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!