राजकिय

महाड मतदार संघात बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जोर

२९ बिनविरोध ग्रामपंचायतींवर आमचे वर्चस्व असल्याचा आमदार भरत गोगावलेंचा दावा

 

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

महाड: दि.11नोव्हेंबर रोजी महाड विधानसभा मतदार संघात बिनविरोध झालेल्या ३४ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकला असल्याचा दावा महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला. मतदार संघात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींपैकी किमान पन्नास ते पंचावन्न ग्रामपंचायतींमध्ये आमच्या पक्षाची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळेस व्यक्त केला.

महाड विधानसभा मतदार संघात महाड तालुक्यातील ७३, पोलादपूर तालुक्यातील १६ आणि माणगांव तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी महाड तालुक्यातील चोवीस, पोलादपूर तालुक्यातील आठ आणि माणगांव तालुक्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. यातील महाड तालुक्यातील १९, पोलादपूर तालुक्यातील आठ आणि माणगांवातील दोन ग्रामपंचायतीं बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे असल्याचे ते म्हणाले. उमेदवारी अर्ज दाखल करताना, उमेदवाराला आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता जो पक्ष करतो, तो उमेदवार त्या पक्षाचा मानला जातो, असा निकष आम्ही लावला असल्याचे ते म्हणाले.

आम्ही केलेली कामे, करणार असलेली कामे आणि जनसंपर्क हेच आमच्या या यशाचे गमक आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकीचा पाया असतो. हाच पाया या निवडणुकीच्या माध्यमातून भक्कम करण्यावर आम्ही भर देत आहेात. ज्या ठिकाणी निवडणूक होत आहे, त्यातील किमान पन्नास ते पंचावन्न ग्रामपंचायती आमच्याकडे येतील असेही ते म्हणाले.

तर नगरपालिकाही बिनविरोध प्रस्ताव आला, तर महाड नगरपालिकेची निवडणूक देखील बिनविरोध करण्यास आमची तयारी आहे. मात्र, नगराध्यक्षपद आमच्याकडे द्यावे लागेल. पुढील दोन वर्षात शहराचाही आम्ही पूर्ण कायापालट करुन दाखवू, असे ते म्हणाले.

श्रीवर्धन आमचे टार्गेट रायगडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे प्रत्येकी तीन आमदार आहेत. हे सहाही आमदार पुन्हा निवडून येतील. आम्ही सहाही जणांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाला टार्गेट केले असून, या मतदार संघातही आमचा आमदार निवडून आणू, असेही ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेला आ. गोगावले, युवासेनेचे कोकण विस्तारक विकास गोगावले यांच्यासमवेत जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, विजय सावंत, महाड तालुकाप्रमुख सुरेश महाडीक, पोलादपूर तालुकाप्रमुख चंद्रकांत कळंबे, शहरप्रमुख नितीन पावले, माजी नगराध्यक्ष सुनिल कविस्कर, माजी जि. प. सदस्य जितेंद्र सावंत, मनोज काळीजकर, सौ. सुषमा गोगावले आणि बिनविरोध निवडून आलेले वीस ते बावीस सरपंच उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!