जिल्हा

दिवेआगरच्या श्री सुवर्ण गणेशाचा मुखवटा घडविणे व प्रतिष्ठापना या बाबत मंत्रालयात बैठक

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन

जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरच्या श्री सुवर्ण गणेशाचा मुखवटा घडविणे व प्रतिष्ठापना करण्यासाठी ताबा सुवर्ण गणेश मंदिरट्रस्टकडे सुपूर्द करण्यासाठी शासन स्तरावर कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत पालकमंत्री  आदिती तटकरे यांच्या विनंतीनुसार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे–पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीस खासदार सुनीलजी तटकरे साहेब, गृहविभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहविभागाचे उप सचिव (विशेष) संजय सक्सेना, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, रायगड अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे व दिवेआगरचे सरपंच व सुवर्ण गणेश मंदिराचे विश्वस्त बाळकृष्ण बापट यावेळी उपस्थित होते.

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राप्त मुद्देमाल राज्यशासनाची मालमत्ता आहे. सद्यस्थितीत हा मुद्देमाल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने उप कोषागार, श्रीवर्धन येथे पोलीस सुरक्षेमध्ये आहे. या मुद्देमालापासून सुवर्ण गणेश मुखवटा घडविणे व सुवर्णगणेश मंदीरात प्रतिष्ठापना करुन त्याचा ताबा मंदीर ट्रस्टकडे सूपूर्द करणेबाबत माहिती बैठकीत दिली.

यावेळी मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुद्देमालापासून सुवर्ण गणेशाच्या आधीच्या मुखवट्याप्रमाणेच नवीन मुखवटा तयार करुन त्याची प्रतिष्ठापना करण्यात यावी. लोक भावना विचारात घेऊन सुवर्ण गणेश प्रतिष्ठापना करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासन वदिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्ट यांनी समन्वयाने करावी, असे निर्देश माननीय गृहमंत्री महोदयांनी संबंधितांना दिले आहेत. यामुळेअनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर सुवर्ण गणेश मुखवट्याची प्रतिष्ठापना लवकरच होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!