जिल्हा

01 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारी बंदी घोषित

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

रायगड: दि. 20 मे 2024 रोजी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी दि.01 जून ते 31 जुलै 2024 रोजी करण्याकरिता मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार मासेमारी बंदी कालावधी घोषित केला आहे.

या कालावधीमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. त्याचप्रमाणे या कालावधीत खराब/वादळी हवामानामुळे होणारी जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली असून पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नाही.

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास/केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 च्या कलम 14 अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल, तसेच कलम 17 मधील तरतुदीन्वये जास्तीत जास्त दंडात्मक शिक्षा करण्यात येईल. दि.01 जून 2024 पूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना दि.01 जून 2024 नंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 अंतर्गत कारवाईस पात्र राहतील,  त्यामुळे सर्व यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका दि.01 जून 2024 वा तत्पूर्वी बंदरात परतणे बंधनकारक आहे याची सर्व  नौकामालकांनी नोंद घ्यावी.  तसेच दि.31 जुलै 2024 वा त्यापूर्वी समुद्रात मासेमारीकरिता जाता येणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!