एका बाजूला चालकांची जीवघेणी कसरत; दुसऱ्या बाजूला गळकी एसटी — प्रवाशांचे हाल कोण पाहणार?

श्रीवर्धन प्रतिनिधी- अनिकेत मोहित
श्रीवर्धन: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यात एसटी चालकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून बस चालवावी लागत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी एसटी रस्त्याच्या कडेला घसरल्याच्या घटना यापूर्वी घडल्या असून, खराब रस्ते, पावसाचे पाणी आणि घसरडी परिस्थिती यामुळे चालकांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. मात्र या गंभीर परिस्थितीत एसटी महामंडळाचा गलथान कारभारही पुन्हा एकदा समोर आला आहे.
लांब पल्ल्याच्या आणि चांगला व्यवसाय करून देणाऱ्या मार्गांवरील अनेक बस निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वारंवार केल्या जात आहेत. प्रवासादरम्यान बस रस्त्यात बंद पडणे, टायर निघून जाणे, यांत्रिक बिघाड होणे अशा घटना नवीन राहिलेल्या नाहीत. आता तर पावसाळ्यात बसच्या आतील भागातच पावसाचे पाणी गळत असल्याने प्रवाशांचे हाल अधिकच वाढले आहेत.
काल श्रीवर्धन–नालासोपारा या मार्गावरील बसमध्ये प्रवास करत असताना मध्येच जोरदार पाऊस सुरू झाला. त्यावेळी बसच्या छतामधून आणि विविध भागांतून पाणी गळू लागल्याने प्रवाशांची अक्षरशः तारांबळ उडाली. काही प्रवाशांनी सीट बदलण्याचा प्रयत्न केला, तर काहींना उभे राहून प्रवास करावा लागला. “तिकीट काढून पैसे देऊन प्रवास करायचा आणि वर असा नाहक त्रास सहन करायचा, ही कोणती सेवा?” असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.
प्रवाशांच्या मते, एसटी महामंडळाची ही अवस्था काही नवीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात गळक्या बस, अपुरी देखभाल आणि प्रवाशांच्या गैरसोयीचा प्रश्न कायम राहतो. एका बाजूला चालक प्रतिकूल परिस्थितीत सेवा देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला बसची दुरवस्था प्रवाशांच्या सुरक्षेलाच धोका निर्माण करत आहे.
पावसाळा सुरू असताना तरी श्रीवर्धन आगारासह संबंधित अधिकाऱ्यांनी बसची तातडीने तपासणी करून गळती, यांत्रिक बिघाड आणि सुरक्षिततेच्या त्रुटी दूर कराव्यात, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. “एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे; ती गळकी आणि धोकादायक नसून सुरक्षित आणि विश्वासार्ह असली पाहिजे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
