शहर

मोबाईलच्या युगात तरुणाईने जपली गणेशोत्सवाची पारंपरिक संस्कृती

श्रीवर्धनमध्ये गणरायासमोर भजन, बैठक नृत्य, गोफ नाचाने रंगतोय पारंपरिक उत्सव

 

अनिकेत मोहित / श्रीवर्धन शहर 

श्रीवर्धन : मोबाईलच्या युगात सण-उत्सवांचे स्वरूप झपाट्याने बदलत असताना श्रीवर्धनमध्ये मात्र तरुण पिढीने आपल्या पारंपरिक संस्कृतीची नाळ घट्ट धरून ठेवली आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध घरांमध्ये आणि मंडळांमध्ये गणरायासमोर पारंपरिक भजन, बैठक नृत्य, गोफ नाच यांसारख्या सांस्कृतिक परंपरांचे सादरीकरण केले जात असून, या माध्यमातून जुन्या पिढीकडून आलेला सांस्कृतिक वारसा नव्या पिढीकडून जपला जात आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनानंतर श्रीवर्धनमधील अनेक ठिकाणी पारंपरिक भजनांच्या बैठका रंगताना दिसत आहेत. टाळ-मृदुंगाचा नाद, अभंग-गवळणींचे सूर आणि त्याला लाभलेली बैठक नृत्याची साथ यामुळे गणरायाच्या चरणी भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या पारंपरिक कलाप्रकारांमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय असून, ज्येष्ठांकडून शिकलेल्या कला ते उत्साहाने पुढे नेत आहेत.

आजच्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या युगात अनेक सण केवळ फोटो, व्हिडीओ आणि रील्सपुरते मर्यादित होत चालल्याचे चित्र दिसते. मात्र, श्रीवर्धनसह परिसरातील गावागावांमध्ये काही तरुण मंडळी याला अपवाद ठरत आहेत. भजन, सेवा, बैठक नृत्य, गोफ नाच अशा पारंपरिक कलांच्या माध्यमातून ते केवळ मनोरंजन करत नाहीत, तर आपल्या सणांचे धार्मिक आणि सांस्कृतिक पावित्र्यही जपण्याचा प्रयत्न करत आहेत.

पूर्वी घराघरांत, वाड्या-वस्त्यांमध्ये आणि मंदिरांच्या परिसरात रंगणाऱ्या या पारंपरिक कला आता नव्या पिढीच्या सहभागामुळे पुन्हा अनुभवायला मिळत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ जल्लोषाचा नव्हे, तर संस्कृती, भक्ती आणि परंपरेचा उत्सव असल्याची जाणीवही या तरुणाईच्या सहभागातून अधोरेखित होत आहे.

परंपरा जपणारी हीच तरुणाई भविष्यातील सांस्कृतिक वारशाची खरी वाहक ठरणार असून, मोबाईलच्या आभासी जगात हरवत चाललेल्या उत्सवांना पुन्हा मातीचा, भक्तीचा आणि संस्कृतीचा सुगंध देण्याचे काम श्रीवर्धनमधील तरुण मंडळी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!