जिल्हा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पेण येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयास दिली भेट

विविध विकासकामांचा मंत्री उदय सामंत घेतला आढावा

स्वप्नील ढवण – उपसंपादक

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामत यांनी आज दि.18 फेब्रुवारी 2022 रोजी शासकीय तंत्रनिकेतन पेण या संस्थेस भेट दिली. यावेळी उदय सामंत यांनी संस्थेस भेट दिल्यावर संस्थेच्या पूर्वीच्या व आताच्या परिस्थितीबाबत संस्थेचे प्राचार्य व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. एस. भामरे यांनी संस्था करीत असलेल्या विकासात्मक कामांचे सादरीकरण केले. त्यांनी संस्थेत प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांचे 100% प्रवेश नियमितपणे होत असल्याचे तसेच निकालाची उज्वल परंपरा सातत्याने राखण्यात येत आहे, असे डॉ. एस. एस. भामरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांना सांगितले.

या सादरीकरणानंतर मंत्री महोदयांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संस्थेत होतअसलेल्या विकासात्मक कार्याबाबत व संस्था करीत असलेल्या कौशल्य विकास कार्याबाबत प्रसारमाध्यमां समोर समाधान व्यक्त केले. पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की, संस्थेच्या नवीन इमारती करीता 10 कोटी 92 लक्ष रुपयांचा प्रस्ताव तत्वत: मान्य करण्यात आला असून जिल्हा नियोजन समितीकडून संस्थेच्या सभागृहाकरिता अंदाजे रु. 75 लाखाची तरतूद मान्य करण्यात आलीआहे. या सभागृहाच्या वापरासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असून ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरण्यास देण्यात येईल. त्यातून होणाऱ्या उत्पन्नातून येथील देखभाल दुरूस्ती करण्याचे नियोजन आहे.

यावेळी 100 प्रवेश क्षमता असलेल्या मुलींचे वसतिगृह बांधण्याकरीता 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्याअधिकाऱ्यांनी सादर करावा, असे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेवे यांना दिले. संस्थेतील विविध दुरूस्तीच्या कामांसाठी 2 कोटी 30 लक्ष रुपयांच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले असल्याचे ही सामंत यांनी सांगितले. रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरीता स्किल डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना शासकीय तंत्रनिकेतन पेण या संस्थेत करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात येणार असून त्यासाठी रु.30 कोटीची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थेच्या प्राचार्यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या सहकार्याने सी. एस. आर निधी मिळवून इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्याकरीता पुढाकार घ्यावा, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सूचित केले.

शासकीय तंत्रनिकेतन, पेण येथे आयोजित आढावा बैठकीत तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ, तंत्रशिक्षण मुंबई विभागीय कार्यालयाचे महासंचालक श्री. प्रमोद नाईक, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, मुंबईचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, कार्यकारी अभियंता श्री. सुखदेवे, पेण प्रांताधिकारी श्री. विठ्ठल इनामदार यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शासकीय तंत्रनिकेतन, पेण चे प्राचार्य डॉ. एस. एस. भामरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!