ब्रिटीश उच्चायुक्त अलेक्स इलिस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा घेतली भेट
अभिजीत ढाणीपकर – शहर प्रतिनिधी महाड
राज्यात अनेक उत्तम पायाभूत सुविधा तसेच कुशल मनुष्यबळ असल्याने येथे गुंतवणुकीच्या विविध संधी उपलब्ध असून इंग्लंड मधील उद्योजकांनी येथे गुंतवणूक करावी असे आवाहन याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यात जागतिक दर्जाच्या समृद्धी महामार्गाचे काम पुर्णत्वास आले असून यामुळे विदर्भातील औद्योगिकीकरणास मोठी चालना मिळणार आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्प, बंगळुरू–मुंबई कॉरीडॉर, कोस्टल रोड, गोवा महामार्ग असे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प प्रगती पथावर आहेत. याचबरोबर २८ टक्क्यांसह महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील आघाडीचे राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आदींची उपलब्धता आहे, त्यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे बोलून महाराष्ट्र आणि इंग्लंड देशामधील घनिष्ट संबंध भविष्यात अधिक दृढ होतील असा विश्वास याप्रसंगी त्याच्या बोलण्यातून दिसून आला.
अलेक्स इलिस यांच्या स्वागतासाठी त्यांना विशेष आवडणाऱ्या वडा पाव आणि रसगुल्याचा बेत या बैठकीसाठी ठेवण्यात आला होता. वडा पाव हा आता ब्रिटनमध्ये देखील लोकप्रिय झाला असल्याचे त्यांनी यासमयी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अलेक्स इलिस त्यांच्यासोबत ब्रिटनच्या मुंबईतील उप उच्चायुक्त कॅथरीन बार्न्स, उप उच्चायुक्तांचे सल्लागार सचिन निकार्गे तसेच राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.
