दिघीच्या वेदांत नागवेकरची राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी

श्रीवर्धन प्रतिनिधी ( अनिकेत मोहित )
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावचा सुपुत्र आणि सध्या मुंबईतील चांदिवली (अंधेरी परिसर) येथे वास्तव्यास असलेला युवा पॉवरलिफ्टर वेदांत दिनेश नागवेकर याने डब्ल्यूआरपीएफ (WRPF) ओपन वेस्ट झोन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप-२०२६ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या ताकदीची छाप पाडली आहे.
अवघ्या १७ वर्षीय वेदांतने ६७.५ किलो सब-ज्युनिअर गटात स्पर्धा खेळताना स्क्वॅटमध्ये १७५ किलो, बेंच प्रेसमध्ये ७५ किलो आणि डेडलिफ्टमध्ये २०० किलो असे मिळून एकूण ४५० किलो वजन उचलत उत्कृष्ट प्रदर्शन केले.
ही स्पर्धा ४ व ५ जुलै २०२६ रोजी मुंबईतील सीईटीटीएम, हिरानंदानी गार्डन्स, पवई येथे महाराष्ट्र रॉ पॉवरलिफ्टिंग असोसिएशन (MRPA) यांच्या आयोजनाखाली पार पडली. विशेष म्हणजे, ही स्पर्धा WRPF इंटरनॅशनल चॅम्पियनशिप-२०२६ साठीची अधिकृत पात्रता स्पर्धा असल्याने देशभरातील नामांकित पॉवरलिफ्टर्सनी यात सहभाग घेतला होता.
दिघी गावाशी घट्ट नाळ जुळलेल्या वेदांतच्या या यशामुळे श्रीवर्धन तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने हे यश संपादन केले असून, आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरही तो राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.
